plan-drafted-farm-roads-akola: बाळापूर मतदारसंघात २०० किमी पाणंद रस्त्यांचा आराखडा; पहिल्या टप्प्यात २५ किमी कामे होणार - बैठकीत आमदार नितीन देशमुख यांचे निर्देश



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत सर्वहंगामी रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 'मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना २०२६' अंतर्गत सुमारे २०० किलोमीटर पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा आराखडा तयार करण्यात आला असून, चालू वित्तीय वर्षात यापैकी २५ किलोमीटर रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश उद्धवसेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या संदर्भात २२ एप्रिल रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृह येथ आढावा बैठक पार पडली. 



बैठकीदरम्यान मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत सर्वहंगामी रस्त्यांची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी टप्प्याटप्प्याने पाणंद रस्त्यांचे नियोजन करण्याबाबत आमदार देशमुख यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच या रस्त्यांमुळे शेतीमालाची वाहतूक सुलभ होऊन शेतकऱ्यांचा वेळ व खर्च वाचणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, पाणंद रस्ते योजनेच्या विद्यमान तरतुदीनुसार एका वित्तीय वर्षात जास्तीत जास्त २५ किलोमीटर अंतराचे पाणंद रस्ते मंजूर करण्याची मर्यादा असल्याने चालू वर्षात प्रथम टप्प्यात २५ किलोमीटर रस्त्यांच्या कामांना प्राधान्याने प्रस्तावित करण्याच्या सूचना आमदार देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. उर्वरित रस्त्यांसाठी पुढील टप्प्यांमध्ये प्रस्ताव सादर करून कामे मार्गी लावण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. 




या बैठकीस उद्धवसेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखडे, शिवसेना नेते बबलू उर्फ अनिरुद्ध देशमुख, उपविभागीय अधिकारी संतोष येवलीकर, तहसीलदार वैभव फरताळे, प्रभारी तहसीलदार दीपक केंद्रे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता उमेश वानखडे, उपअभियंता संजय राठोड, गटविकास अधिकारी सतीश नायसे, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक सोळंके उपस्थित होते.

टिप्पण्या