love-jihad-online-game-akola-: हरियाणातील तरुणी प्रकरणाने अकोला हादरले; ‘लव्ह जिहाद’ की ऑनलाईन गेमिंगचा सापळा?
ठळक मुद्दा
बजरंग दलाचा गंभीर आरोप, पोलिसांचा संयमित तपास; सोशल मीडिया व गेमिंगमधून ओळख वाढल्याचा प्राथमिक अंदाज
अकोला शहरात हरियाणातील एका तरुणीशी संबंधित प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चा रंग देत बजरंग दलाने गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी याकडे सावधपणे पाहत सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेमिंगमधून ओळख वाढल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील फरिदाबाद येथील एका तरुणीशी अकोल्यातील एका युवकाची ऑनलाईन गेमिंग ॲपवर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर घरगुती किरकोळ वादातून ही मुलगी घरातून निघून अकोल्यातील युवकाकडे आली. ही युवती मागील पाच दिवसांपासून अकोल्यात या युवकाकडे राहत असल्याचे कळते. तर दुसरी कडे या मुलीच्या पालकांनी त्यांच्या गावात मुलगी बेपत्ताची पोलिसात खबर दिली असल्याचे कळते. जमीर काझी असे युवकाचे नाव सांगितले जात असून तो विवाहित असून दोन मुलांचा पिता असल्याचा आरोप आहे. या युवकाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर बनावट नावांनी अकाउंट असल्याचेही आता समोर येत आहे. या प्रकरणी अकोल्यातील बजरंग दल व विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा उपस्थित केल्याने हे प्रकरण उजेडात आले.
बजरंग दलाच्या मते, सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी मैत्री केली जाते, त्यांचे मानसिक ब्रेन वॉश केले जाते आणि नंतर प्रेमसंबंध, आर्थिक मदत व खोट्या आश्वासनांच्या आधारे त्यांना जाळ्यात ओढले जाते. या प्रकारामागे मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
मात्र, अकोला पोलिसांनी या प्रकरणात संतुलित भूमिका घेतली आहे. प्राथमिक चौकशीत सोशल मीडिया व ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवरून ओळख वाढल्याचे संकेत मिळत आहेत. सतत मोबाईल वापर, अनोळखी व्यक्तींशी संवाद आणि गेमिंगमधील चॅटिंग यामुळे तरुण-तरुणींवर मानसिक प्रभाव पडत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलीसांनी कायदेशीर प्रक्रिया राबवित फरिदाबाद पोलीस स्टेशन व पालकांना कळविले आहे. मुलीचा भाऊ अकोल्यात पोहचला असल्याचेही कळते. तसेच फरिदाबाद पोलीस अकोल्यात आल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान युवकास पोलीसांनी चौकशी कामी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
सध्या या प्रकरणात संबंधित तरुणीचा जबाब, मोबाईल डेटा, सोशल मीडिया चॅट्स तसेच आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणाचे खरे स्वरूप स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये अफवा पसरवू नयेत, तसेच अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
ठळक मुद्दे :
हरियाणातील तरुणी आणि अकोल्यातील युवक प्रकरणाने खळबळ
बजरंग दलाचा ‘लव्ह जिहाद’चा आरोप
युवक विवाहित असल्याचा दावा
सोशल मीडिया व ऑनलाईन गेमिंगमधून ओळख वाढल्याचा संशय
पोलिसांकडून मोबाईल डेटा व आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू
अफवा न पसरवण्याचे पोलिसांचे आवाहन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा