cyber-crime-online-fraud-akola: सायबर पोलिसांची मोठी कारवाई : ८० लाखांच्या ऑनलाइन फसवणुकीतील आरोपी पालघरमधून जेरबंद!

नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची लूट; आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सायबर पोलिसांनी उलगडला गुन्हा




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला सायबर पोलीस स्टेशनने तब्बल ८०,०५,८३० रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई करत दोन आरोपींना मुंबईतील पालघर येथून अटक केली आहे. नोकरीच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या टोळीचा अखेर पर्दाफाश झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिरासिंग स्वरूपसिंग ठाकुर यांनी १५ डिसेंबर २०२५ रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनी एका वृत्तपत्रातील लहानशा जाहिरातीवर विश्वास ठेवून संपर्क साधला. संबंधित व्यक्तींनी पार्टटाईम/फुलटाईम जॉबचे आमिष दाखवत सुरुवातीला १,००० रुपये नोंदणी शुल्क घेतले.

यानंतर आरोपींनी “हाय-प्रोफाइल महिला व मुलींशी मैत्री” आणि महिन्याला २०,००० रुपये उत्पन्नाचे आमिष दाखवले. पुढे मसाजसाठी साहित्य व औषधे खरेदी करण्यास सांगून गुंतवणुकीच्या नावाखाली फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने तब्बल ८० लाखांहून अधिक रक्कम उकळली. मात्र कोणतेही साहित्य न देता आरोपींनी पैसे परत देण्यास टाळाटाळ केली.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिसांनी गुन्हा क्र. १३/२०२५ अंतर्गत बीएनएस कलम ३१८(४), ३(५) आणि आयटी अॅक्ट ६६(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान डिजिटल पुरावे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यात आला. २७ मार्च २०२६ रोजी पोलिस पथक पालघर (मुंबई) येथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने रूबीना फारूक शेख आणि अतिष दिलीप गुप्ता या दोन्ही आरोपींना ३० मार्च रोजी ताब्यात घेण्यात आले.

३१ मार्च २०२६ रोजी आरोपींना अकोला येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ३ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल जुमळे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने अत्यंत कौशल्याने गुन्हा उघडकीस आणला.


 ठळक मुद्दे 

  •  ८०,०५,८३० रुपयांची मोठी ऑनलाइन फसवणूक

  •  नोकरीच्या आमिषाने नागरिकाची लूट

  •  पालघर (मुंबई) येथून दोन आरोपी अटक

  •  डिजिटल पुरावे व तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास यशस्वी

  •  ३ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी

  •  सायबर पोलिसांची प्रभावी कारवाई


नागरिकांसाठी सूचना :

  • कोणत्याही नोकरीच्या जाहिरातीवर लगेच विश्वास ठेवू नका

  • आधी पैसे मागणाऱ्या ऑफर्सपासून सावध राहा

  • अनोळखी व्यक्तींना ऑनलाइन पैसे ट्रान्सफर टाळा

  • संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधा




टिप्पण्या