ठळक मुद्दा
निवडून आलेल्या ६ पैकी ४ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश; उबाठा गटात उरले फक्त दोन सदस्य
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर राजकीय वातावरण शांत होत असतानाच आता पुन्हा एकदा पक्षांतराच्या राजकारणाने जोर धरला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का देत निवडून आलेल्या सहा नगरसेवकांपैकी चार नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे अकोल्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात नगरसेवक मनोज पाटील, सागर भारुका, सोनाली सरोदे आणि सुरेखा काळे यांनी अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना नेते चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या नेतृत्वात पार पडला.
या घडामोडीला आणखी वजन देणारी बाब म्हणजे उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष मंगेश काळे यांनी देखील शिंदे गटाची वाट धरली आहे. त्यामुळे उबाठा गटाला अकोल्यात मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, मनोज पाटील हे प्रहारचे महानगर अध्यक्ष असून त्यांनी प्रभाग क्रमांक ५ मधून उबाठासोबत युतीत निवडणूक लढवली होती. मात्र निवडून आल्यानंतर आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे.
शिवसेना उपनेते आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या पक्षांतरानंतर अकोला महानगरपालिकेत भाजप प्रणित शहर सुधार आघाडीची ताकद वाढली आहे. स्वीकृत नगरसेवकांसह या आघाडीची सदस्यसंख्या आता ५३ वर पोहोचली असल्याची माहिती समोर आली आहे. शहर व प्रभागाच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे या नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर अकोल्यातील शिवसेना उबाठा गटात आता केवळ दोन नगरसेवक उरले असून स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्दे
अकोला महापालिकेत उबाठा गटाला मोठा धक्का
६ पैकी ४ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
मनोज पाटील, सागर भारुका, सोनाली सरोदे, सुरेखा काळे यांनी घेतला निर्णय
जिल्हाध्यक्ष मंगेश काळे यांनीही शिंदे गटाची वाट धरली
शहर सुधार आघाडीची ताकद वाढून सदस्यसंख्या ५३ वर
उबाठा गटात आता केवळ २ नगरसेवक शिल्लक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा