shiv-jayanti-ramadan-festival: शिवजयंती–रमजान एकत्र; उत्सव निर्विघ्न पार पाडा, आमदार पठाण यांचे आवाहन, मनपा आयुक्त व पोलीस अधीक्षकांसोबत घेतली बैठक



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : शहरात शिवजयंती आणि पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ एकाच काळात होत असल्याने प्रशासनाने समन्वय साधत काटेकोर व्यवस्था करावी, अशी ठाम भूमिका अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी घेतली. यासाठी त्यांनी मनपा आयुक्तांसोबत तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन ठोस निर्देश दिले.


मनपा आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत आ. पठाण यांनी शहरातील सर्व मशिदींमध्ये बंद असलेली वीज जोडणी तातडीने सुरू करावी, पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा आणि शिवजयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक भागात विशेष स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली.

जन्म-मृत्यू नोंदणीसाठी भरतीया रुग्णालयात केवळ एकच खिडकी कार्यरत असल्याने नागरिकांना मोठा त्रास होत आहे. यावर उपाय म्हणून आणखी पाच खिडक्या सुरू करण्यास आयुक्तांनी तत्त्वतः मान्यता दिल्याचे आ. पठाण यांनी सांगितले. तसेच सर्वोपचार रुग्णालयातील टीबी यंत्रणा महापालिकेच्या ताब्यात असून दोन्ही विभाग जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्याच्या तक्रारीवरही तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे गटनेते डॉ. जीशान हुसेन, मो. युसुफ, मोईन खान, महेंद्र गवई, गजानन कांबळे आदीसह मनपाचे उपआयुक्त व सर्व अधिकारी उपस्थित होते.





पोलीस अधीक्षकांसोबत कायदा-सुव्यवस्थेचा आढावा


आ. पठाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासोबत विजय सभागृहात बैठक घेतली. शिवजयंती आणि रमजानदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी केली. रमजानच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील मुस्लिम समाजाला खरेदीसाठी रात्रीच्या वेळेत आवश्यक ती मुभा द्यावी, अशी विनंती आ. पठाण यांनी केली. तसेच कोणत्याही समाजात गैरसमज किंवा तणाव निर्माण होणार नाही, यासाठी सर्व पोलीस निरीक्षकांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश दिले. पोलीस प्रशासनानेही सहकार्याची भूमिका घेतल्याचे बैठकीनंतर स्पष्ट झाले. 


शहरात दोन मोठे उत्सव एकत्र येत असताना प्रशासनाने संवेदनशीलता व समन्वय राखत नियोजन करावे, अशी विनंती वजा सूचना या बैठकीतून देण्यात आली.

टिप्पण्या