sajid-pathan-lawrence-bishnoi: आ. साजिद पठाण यांना ‘लॉरेन्स बिश्नोई’ गँगकडून धमकी प्रकरणी विधिमंडळ गाजले


ठळक मुद्दा

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांचे आश्वासन – ‘पूर्ण सुरक्षा, आरोपीचा शोध सुरू’



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण  यांना कुख्यात 'लॉरेन्स बिश्नोई' गँगकडून दहा कोटी रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी विधानसभेत पुन्हा एकदा गाजला. “दहा कोटींची व्यवस्था नाही केली तर तुझी बाबा सिद्दीकीसारखी हत्या करू,” असा थेट इशारा देण्यात आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.


गँगस्टर शुभम लोणकर याने फोन करून धमकी दिल्याचा आरोप असून, या गंभीर प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करत आ. पठाण यांना तात्काळ ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याची आणि धमकी देणाऱ्या आरोपीला त्वरित अटक करण्याची जोरदार मागणी केली.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्या दिवशी आ. पठाण यांना कॉल आला, त्याच दिवशी मी त्यांच्याशी संपर्क साधला. अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांना तातडीने आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. आ. साजिद खान पठाण यांना संपूर्ण पोलिस सुरक्षा देण्याचे आदेश गृह विभागाला देण्यात आले आहेत.”

फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शुभम लोणकर हा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती सध्या फरार असला तरी त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली आहेत. कोणत्याही परिस्थितीत आमदारांच्या सुरक्षेशी तडजोड होणार नाही.”


दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, विरोधकांनी सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. आमदाराला थेट खंडणीची धमकी दिली जाणे हे चिंताजनक असल्याचे मत सभागृहात व्यक्त करण्यात आले.


आ. पठाण यांच्या सुरक्षेची जबाबदारी गृह विभागाची असून “त्यांना काहीही होऊ देणार नाही,” अशी ठाम ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याने प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. आता आरोपीच्या अटकेकडे आणि वाढीव सुरक्षेच्या अंमलबजावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या