भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोट येथे बँकेची आणि तब्बल 435 महिला ग्राहकांची लाखो रूपयांनी आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपी कर्मचारी राहूल देशपांडे याचा जमानत अर्ज अकोट सत्र न्यायालयाने आज फेटाळला. आरोपी हा एप्रिल 2025 पासून अकोला कारागृहात बंदिस्त आहे.
दिनांक 23 जून 2025 रोजी अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनचे फाईल वरील अप. क्र. 127/2025, कलम 316 (5), 318(4),3(5) भान्यासं. यामधील आरोपी राहूल बाजीप्रभू देशपांडे, (वय 38 वर्ष, राहणार देशपांडे प्लॉट साईनगर अमरावती ता.जि. अमरावती) याने अकोट येथील इसाफ स्मॉल फायन्सस बैंकच्या 435 महिला ग्राहकांची बँकेच्या इतर दोन कर्मचाऱ्यांसोबत मिळून बँकेची व ग्राहकांची एकूण 19,84,891 रूपयांनी आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात दाखल केलेला जमानत अर्ज नामंजूर केला आहे. आरोपी राहूल देशपांडे हा या बँकेमध्ये व्यवस्थापकीय पदावर कार्यरत होता. या प्रकरणात 19 एप्रिल 2025 पासून अकोला कारागृहात बंदिस्त आहे.
या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जमानत अर्जाला विरोध करताना न्यायालयात लेखी उत्तर व युक्तीवाद सादर केला की, या प्रकरणात अकोट येथील बँकेचे एरिया मॅनेजर मनोज खंडारे यांनी या बँकेचे कर्मचारी राहुल बाजीप्रभू देशपांडे (साई नगर अमरावती), दीपक शांतीराम कांबळे (कळंबा मोहाली ता. जि. वाशिम), यश श्रीकृष्ण मनोहर (रा. वनोजा पो. शेलूबाजार ता. मंगरूळपिर जि. वाशिम) या बँकेच्या तिन्ही कर्मचाऱ्यांविरूध्द लेखी फिर्याद दिली की, तिघेही बँकेमध्ये कार्यरत होते, या तिघांनी बँकत एकूण 19,84,891 रूपयाचे आर्थिक व्यवहार करून, एकूण बँकेतून लोन घेतलेल्या 435 महिला ग्राहकांची व बँकेची फसवणूक केली आहे. बँकेच्या नियमानुसार तिन्ही आरोपींनी महिला बचत गटांना कर्ज देण्याच्या प्रक्रियेत बँकेच्या नियमांचे पालन केले नाही. कर्जासाठी लागणाऱ्या कागदांवर महिला ग्राहकांचे सही व अंगठे घेवून काही महिलांना लोन दिले नाही तर, काहींना लोन दिले व सदर महिला यांच्याकडून वसुल केलेले कर्जाचे पैसे बँकेत जमा केले नाहीत. कर्ज खाते बंद केल्याबद्दल काही महिलांकडून पैसे घेतले ती रक्कम सुध्दा बँकेत जमा केली नाही. काही महिलांचे एटीएम बँकेकडून घेवून, एटीएम चे वाटप बचत गटातील ग्राहक महिलांना केले नाही. व त्या एटीएमचा वापर आरोपींनी स्वतः केला व एटीएमद्वारे आलेली रक्कम स्वतःकडे ठेवली. काही महिला ग्राहकांनी बँकेकडे तकारी देखील केल्या व यासंबंधी आर्थिक अंकेक्षण अहवालामध्ये 19,84,891 रूपयाचा अपहार झाल्यासंबंधी अहवालामध्ये यासर्व आरोपींचे आर्थिक ऑडीटमध्ये नमूद केले आहे. व अशा प्रकारे या तिघांनी संगणमत करून बँकेची व 435 महिला ग्राहकांची 19,84,891 रूपयांनी फसवणूक करून सदर रक्क्म या तिघांनी स्वतः साठी वापरून बँकेची व ग्राहकांची आर्थिक फसवणूक केलेली आहे. अशा फिर्यादीवरून अकोट शहर पो.स्टे. ला 15 एप्रिल 2025 रोजी गुन्हयाची नोंद करण्यात आली. या आरोपीकडे बँकेच्या स्टाफ सेल्समॅननी ग्राहकांकडून जमा केलेली रक्कम बँकेच्या रजिस्टरमध्ये नोंद घेणे व ती रक्कम बँक काउंटरवर जमा करणे हे काम बँकेने दिले होते.
या आरोपींची महिला ग्राहकांना कर्ज वाटप व कर्ज घेणे-देणे यासंबंधी पावत्यांवर आरोपींच्या सहया आहेत. याचे विरोधात फिर्यादीने बँकेच्या वरीष्ठांना अपहार झाल्याबाबत अहवाल सादर केला होता. बँके मार्फत जे ऑडीट घेण्यात आले, त्यामध्ये उपरोक्त अपहार झाल्याचे दिसून आल्याने तिन्ही आरोपींविरूध्द अकोट शहर पो.स्टे. ला बँकेने फिर्याद दिल्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला.
या आरोपीच्या तपासात चौकशीमध्ये साक्षीदार व बँकेतील महिला ग्राहक ज्यांचे बयाण घेतले असता, त्यामध्ये हा आरोपी व त्याचे दोन साथीदार यांनी ग्राहकांची फसवणूक करून वरील रक्कम स्वतः साठी वापरली असा उल्लेख आहे. तसेच हा आरोपी व इतर दोन आरोपी म्हणजे या बँकेच्या तिन्ही कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बँकेची व ग्राहकांची फसवणूक केली असे अंकेक्षण अहवालामध्ये नमूद आहे.
आरोपी राहूल देशपांडे याचे इतर दोन साक्षीदार हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाले आहे. तसेच या अर्जदाराकडून ग्राहकांच्या एटीएम कार्ड बाबत व अपहार केलेल्या रकमेचे काय केले याबाबत तपास करणे आवश्यक आहे. तसेच ऑडीट अहवालाप्रमाणे अपहार झालेली रक्कम आरोपी कडून हस्तगत करणे बाकी आहे. अपहार केलेली रक्कम कुठे व कशी खर्च केली तसेच बँकेतील खात्यांबाबत सखोल तपास या प्रकरणामध्ये होणे आवश्यक आहे. तसेच या प्रकरणात तपास पूर्ण झालेला नाही. हा लाखो रूपयांचा आर्थिक घोटाळा आहे. यामध्ये महिला बचत गटातील मोल मजुरी करणाऱ्या 435 महिलांची मोठया प्रमाणावर आर्थिक फसवणूक झालेली आहे. या प्रकरणात तपास पूर्ण झालेला नाही. अकोट शहरचे पोलीस निरीक्षक माळवे व पोलीस उपनिरीक्षक निलेश बारहाते या प्रकरणाचा तपास करित असून, अकोट शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल पोलीस अधिक्षक अकोला यांना अहवाल सादर केल्यावरून पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे बँकेच्या या लोखो रूपयांच्या घोटाळयात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे आरोपीचा हा जमानत अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात केला.
या प्रकरणात सरकार पक्षाला अडव्होकेट शुभम सुर्यवंशी यांनी सहकार्य केले. व दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आरोपी राहूल देशपांडे याचा जमानत अर्ज नामंजूर केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा