tukdoji-maharaj-punyatithi-mahotsav-2023: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव 2023: युवकांनी मानवतावादी होणे आवश्यक आहे- प्रकाश महाराज वाघ





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: कट्टरवादी विचार समाजासाठी घातक असून असे विचार समाज हिताचा विचार करीत नाहीत. त्यामुळे आज युवा पिढी भरकटत आहे. यासाठी आजच्या युवकांनी मानवतावादी होणे आवश्यक आहे. संतांचे मानवतावादी विचार समाजासाठी पोषक असल्याचे मत गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार प्रमुख प्रकाश महाराज वाघ यांनी व्यक्त केले.




राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती अकोला शाखा व अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे स्वराज्य भवनाच्या प्रांगणात 23 ते 25 डिसेंबर कालावधीत आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष भाषणात ते बोलत होते. शनिवार 23 डिसेंबर रोजी महोत्सवाचे उद्घाटन झाले.




यावेळी स्वागताध्यक्ष सम्राट डोंगरदिवे, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, दामोदर पाटील, उद्घाटक ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाघ, बालमुकुंद भिरड, बलदेव पाटील, कृष्णा अंधारे, सुखदेव महाराज गाडेकर यांच्यासह रवींद्र मुंडगावकर, गजानन काकड, डॉक्टर त्र्यंबकराव आखरे आदी उपस्थित होते.



 

जीवनाच्या प्रगतीचा मार्ग ग्रामगीते सापडतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. अशा महोत्सवातून युवकांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे रोपण होत असल्याचे मत हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी व्यक्त केले ज्ञानेश्वर महाराज वाघ उद्घाटक म्हणून बोलत होते.




महाराष्ट्रात आजचे जे राजकरण सुरू आहे. त्यात सर्वसामान्य जनता संभ्रमित आहे. कोणता पक्ष कोणाचा आणि कोणता नेता कोणत्या पक्षाचा काहीच समजत नाही. अशा परिस्थितीत  शेतकरी अडचणीत आले असून शेतकऱ्यांपुढे अनेक समस्या उभ्या आहेत. राष्ट्रसंतांचे विचार गावागावात पोहोचून ग्रामगीता राबविल्यास बळीराजाचे राज्य आल्याशिवाय राहणार नाही, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केले. 






यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात समाजकार्य  करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शिवाजी म्हैसणे यांनी केले आभार श्रीकृष्ण सावळे यांनी मानले.




तत्पूर्वी राष्ट्रसंतांची श्री राज राजेश्वर मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत विदर्भातून २० ते २५ दिंड्या सहभागी झाल्या होत्या जय हिंद चौक सिटी कोतवाली चौक गांधी रोड अशी मार्ग क्रमांक करून स्वराज्य भवन परिसरात शोभायात्रा पोहोचली.



तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणादायी विचारांची समाजाला गरज- स्वागताध्यक्ष सम्राट डोंगरदिवे 




“ भौतिक आसक्तींपासून मुक्त राहून साधे जीवन जगण्याच्या महत्त्वावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भर दिला. आपले जीवन साधेपणाने आणि निसर्गाशी एकरूप राहूनच खरा आनंद आणि समाधान मिळू शकते असा त्यांचा विश्वास होता. अहिंसा आणि सहानुभूतीवर जोर देणारे त्यांचे करुणेचे तत्वज्ञान सर्व सजीवांसाठी विस्तारले आहे. अशा तत्त्वज्ञानाची आज समाजाला नितांत गरज आहे, असे विचार यावेळी भारतीय अलंकार न्यूज 24 शी बोलताना स्वागताध्यक्ष सम्राट डोंगरदिवे यांनी व्यक्त केले.


टिप्पण्या