Rain update: संततधार पर्जन्यमानामुळे अकोला जिल्ह्यात जनजीवन विस्कळले: घरांची पडझड, नदी नाले ओव्हरफ्लो, अकोट-अकोला मार्ग बंद, 20 जुलै पर्यंत अकोल्यात पाऊसाचा मुक्काम!



भारतीय अलंकार 24

अकोला, दि18:जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या संततधार पर्जन्यमानामुळे  अनेक ठिकाणी पाणी साचणे, धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदी, नाल्यांतील पाण्याची पातळी वाढणे, घरांची अंशतः पडझड झाल्याचे वृत्त आहे. याबाबत प्रशासकीय यंत्रणा दक्ष असून  मदत व बचाव कार्य करीत आहे.गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पुलावरून पाणी गेल्याने अकोला - अकोट मार्ग बंद झाला आहे.



आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार अकोला तालुक्यात ६६ घरांचे अंशतः नुकसान झाल्याची नोंद आहे. उगवा येथील पुलावरुन पाणी वाहत असल्याने रस्ता बंद आहे. अकोला ते वाडेगाव हा रस्ताही बंद आहे. मोराडी रस्ता तसेच अकोला ते म्हैसांग रस्त्यावर पाणी आहे. नदी नाल्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


बाळापूर तालुक्यात  आठ घरांचे अंशतः नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  तर पुरामुळे अकोला गायगाव हा मार्ग बंद करण्यात आला आहे. लोहारा येथे मन नदीवरील वाहतुक सद्यस्थितीत सुरळीत आहे. पारस धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. बाळापूर येथील पुलावर आलेले पाणी आता ओसरले असून स्थिती पूर्वपदावर येत आहे. नदी काठांवर असलेल्या गावांमध्ये दवंडीद्वारे सतर्कतेची सुचना देण्यात आली आहे. मौजे उरळ बु. येथे विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.


तेल्हारा तालुक्यात  पाच घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. पूरस्थितीबाबत नदी काठावरील गावांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. वान धरणात ५९.५० टक्के साठा झाला आहे.


मुर्तिजापूर तालुक्यात दोन घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तरपोही गावात जाण्या- येण्याचा मार्ग, कळमगंगा नदीला  पूर आल्यामुळे धोत्रा ते निंभा रस्ता,  तसेच गोरेगाव येथील कोलाडी नाल्यास पूर आल्यामुळे मुर्तिजापूर ते पळसो हे रस्ते बंद आहेत. तालुक्यातील उमा धरणात ३१.५२ टक्के तर वाई धरणात ५९.०३ टक्के जलसाठा झाला आहे. चिखली येथील कोडा नाला येथे पूर आल्यामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


 पातुर तालुक्यात सामान्य स्थिती आहे. गेल्या २४ तासांत कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.


 बार्शीटाकळी तालुक्यात  आठ घरांचे अंशतः नुकसान तर एका घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे. दोन बैल मृत झाले आहेत.  दोनद बु. हा रस्ता तात्पुरता बंद करण्यात आला आहे.


अकोट तालुक्यात केळीवेळी, गिरजापूर, धारुर येथे अतिवृष्टीमुळे अनेक शेतात पाणी जमा झाले आहे. पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोपटखेड धरणातून विसर्ग होत आहे.


 पर्जन्यमानाचा इशारा


भारतीय हवामान विभाग, नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि.२० जुलै पर्यंत अकोला जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस (७६ ते १०० मि.मी.) होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा


संततधार पावसामुळे जिल्ह्यातील दगडपारवा प्रकल्पांत ६१.४ टक्के पाणीसाठा जमा झाला असून  आणखी पाणीसाठा होत आहे. त्यामुळे या पाण्याचा विसर्ग मोर्णा नदीत होण्याची शक्यता आहे. तसेच अकोट तालुक्यात पोपटखेड प्रकल्पातही  ७८.०६ टक्के जलसाठा झाला असून  या प्रकल्पातून पठार व खैनदी या नद्यांच्या पात्रात १८८.९३ क्युमेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.  अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात पुर्णा मध्यम प्रकल्पातून १३४.९९ क्युमेक पाण्याचा विसर्गपुर्णा नदीत केला जात आहे. त्यामुळे या नद्यांच्या काठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुका व ग्रामस्तरावरील अधिकारी- कर्मचारी यांनी मुख्यालयीच रहावे,असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.


तसेच नदी नाल्याच्या काठावर असलेल्या गावांनी तसेच पुराचा प्रभाव असलेल्या वस्त्यांमधील रहिवाशांनी  सतर्क रहावे. नदी, नाळे, तलाव बंधारे येथील जलसाठ्यात पोहण्याचे वा पूरस्थितीतून बाहेर पडण्याचे धाडस नागरिकांनी करु नये. पुलावरुन रस्त्यावरून पाणी वाहत असल्यास दक्षता घ्यावी,असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.


पर्जन्यमान व नुकसान  


अकोला जिल्हयामध्ये झालेल्या पाऊस व अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान अहवाल 


18 जुलै रोजी अकोला जिल्हयामध्ये सरासरी  35.9 mm पावसाची नोंद झाली आहे.

व्याळा येथे 68.00mm तर निंबा निंबा 90.00 mm पाऊस झाल्याची नोंद आहे.




हे रस्ते बंद 

अकोला गायगांव मार्ग बंद, मुर्तिजापुर तालुक्यातील धोत्रा निंभा रस्ता बंद आहे.

मुर्तिजापुर पळसो रस्ता बंद आहे.

अकोला वाडेगांव रस्ता बंद आहे.

अकोला मोराडी ग्राम रस्ता बंद आहे.

 बार्शिटाकळी दोनद बु रस्ता बंद आहे.

 अकोला म्हैसांग रस्त्यावरील आपोती गांवाजवळ रस्त्यावर पाणी वाहतुकीस अडथळे निर्माण झाले आहेत. गांधीग्राम पुलावरून पाणी जात असल्याने सायंकाळी अकोट अकोला मार्ग बंद करण्यात आला.


हे मार्ग सुरु 


अकोट आडसुळ निंबा शेगांव मार्ग सुरु आहे.



अकोला बाळापुर रस्ते मार्ग सुरु आहे.




शेतीपिकाचे नुकसान प्राथमिक अहवाल 33426 हे. आर. गावाची संख्या 228


शोध व बचाव कार्याबाबत जिल्हयातील पुरस्थितीच्या अनुषंगाने दोन बोटीसह शोध व बचाव पथके सज्ज आहेत.


दरम्यान आज सकाळी  जिल्हाधिकारी महोदया यांनी बाळापुर तालुक्यातील उरळ बु येथे भेट देऊन पुरस्थितीची पाहणी केली आहे.




पूर्णा नदी:सतर्कतेचा इशारा


पुर्णा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी साठ्यात वाढ झालेली आहे. तसेच प्रकल्पात येव्याचे प्रमाण सुरु असुन आज दिनांक १८/०७/२०२२ रोजी दुपारी १६:०० वाजता प्रकल्पाचा विसर्ग वाढवुन ९ गेट ३० से.मी. मधुन एकुण विसर्ग २०९ घ.मी.प्र.से. करण्यात येत असुन पाणी पुर्णा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.   



राजेश्वर सेतूवरील वाहतुक बंद 



अकोला महागराच्या मध्य भागातून वाहणारी मोर्णा नदीला गेल्या दोन दिवासत झालेल्या अतिवृष्टीमुळे पुर आला आहे. तसेच वाहतुकी दरम्यान कोणतीही हानि होऊनये या उद्देशाने मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने राजेश्वर सेतू वरील वाहतुक रस्त्याच्या दोन्ही बाजूने बॅरीकॅटींग आणि बॅनर लावून तुर्त नागरिकांनी पुराचे पाणी पुर्णपणे उतरल्याशिवाय या मार्गाचा वापर टाळून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.




टिप्पण्या