AMC_General_Election_2022: MH: प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी मुदतवाढ; 19 जागृक मतदारांनी बुधवारी नोंदविल्या 30 हरकती



भारतीय अलंकार 24

अकोला दि. 29 : अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या अनुषंगाने प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी गुरुवार, 23 जून  रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही यादी अकोला महानगरपालिकेच्या  संकेत स्थळावर https://www.amcakola.in, अकोला महानगरपालिका मुख्‍य कार्यालय तसेच प्रभागाची यादी संबंधित क्षेत्रीय कार्यालयामध्ये (झोन कार्यालय) पाहण्यास उपलब्ध आहे.  



मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे या संदर्भातील दुरुस्त्या करण्यासाठी निवडणूक कार्यालय (मनपा स्‍थायी समिती सभागृह) अकोला महानगरपालिका येथे व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. बुधवार 29 जून रोजी 19 हरकतदारांनी एकुण 30 हरकती नोंदविल्‍या आहे.



ट्रू- व्होटर मोबाईल ॲप 

सार्वत्रिक निवडणुक – 2022 च्‍या अनुषंगाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, त्यातील मतदारांची नावे तपासण्याची आणि हरकती दाखल करण्याची सुविधा ‘’ट्रू- व्होटर’’ मोबाईल ॲपद्वारे सुध्‍दा उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी याचा लाभ नागरिकांनी घेण्‍याचे आवाहन मनपा प्रशासनाव्‍दारा करण्‍यात आले आहे.


महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ.



विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी असलेली 1 जुलै 2022 पर्यंतची मुदत आता मा.राज्‍य निवडणूक आयोग यांच्‍या आदेशान्‍वये 3 जुलै 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.


 

अकोला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 च्‍या अनुषंगाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या निवडणूक विभाग (स्‍थायी समिती सभागृह), चारही झोन कार्यालय, संकेतस्थळ (https://www.amcakola.in), आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपवरही उपलब्ध आहेत. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत होती, परंतु ही मुदत आता 3 जुलै 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यासाठी रविवार व शनिवारच्या सुट्टीच्या दिवशीदेखील आवश्यक ती व्यवस्था करण्यात करण्यात आली आहे.


अशी नोंदवा हरकत 


महानगरपालिका कार्यालय किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या ठिकाणी आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारे देखील हरकती व सूचना दाखल करता येतील. ट्रू- व्होटर मोबाईल ॲप ‘प्ले स्टोअर’वरून आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करता येईल. त्याआधारे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत आपले नाव शोधून त्याबाबत हरकत असल्यास तीही दाखल करता येईल. ‘व्होटर लीस्ट’ सर्च या मेनूवर क्लिक केल्यावर आपले नाव व मोबाईल नंबर टाकून पुढे जाता येईल. नाव शोधल्यावर आपला संपूर्ण तपशील दिसू शकेल. त्यासंदर्भातील हरकती साठी ‘व्होटर लीस्ट ऑबजेक्शन’ यावर क्लिक करून ‘व्होटर लीस्ट इलेक्शन प्रोग्राम 2022’ निवडून पुढे योग्य त्या पर्यायावर जाऊन आपली हरकत नोंदविता येईल.



प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 9 जुलै रोजीच प्रसिद्ध


विधानसभा मतदारसंघाची यादी प्रभागनिहाय विभाजित करताना त्यात नवीन नावांचा समावेश करणे किंवा नावे वगळण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. एखाद्या मतदारास चुकीचा प्रभाग वाटप झाल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही महानगरपालिकेच्या मतदार यादीत नाव नसल्यास, हरकत दाखल करता येते. हरकती व सूचना दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असली तरी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 9 जुलै रोजीच प्रसिद्ध करण्यात येतील कृपया याची नोंद घ्‍यावी,असे आवाहन अकोला महापलिकेने केले आहे. 





टिप्पण्या