Ravi Rana-Navneet Rana-bail-court: रवि राणा आणि नवनीत राणा यांचा जामीन अर्ज मंजूर; तूर्तास दिलासा

                           Photo:social media




मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह धरणे, चिथावणीखोर वक्तव्य, करणे, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती अपक्ष आमदार रवी राणा यांना अटक झाली होती. आज राणा दाम्पत्याच्‍या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होवून, न्यायलयाने जामीन अर्ज मंजूर केला आहे. यामुळे 11 दिवस न्‍यायालयीन काेठडीत असणार्‍या राणा दाम्‍पत्‍याला तुर्तास दिलासा मिळाला आहे.



मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थान समोर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह धरणाऱ्या राणा दाम्पत्यांना खार पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर दोघांनाही वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या राणा दाम्पत्यांच्या जामीन याचिकेवर शनिवार 30 एप्रिल रोजी सुनावणी झाली होती. साेमवारी जामीन अर्जवरील युक्‍तीवाद पूर्ण झाला हाेता. यावेळी सरकारी वकीलांचा युक्तीवाद ऐकून घेत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आज न्यायालयाने निर्णय जाहीर केला. काही अटी व शर्थी घालून राणा पती पत्नी यांना जामीन देण्यात आला.



यामध्ये पत्रकारांशी संवाद साधू नये, पोलिस तपासात अडथळे निर्माण होतील असे कोणतेही कृत्‍य करु नये, साक्षीदारांना प्रलोभन दाखवणे अथवा त्‍यांच्‍यावर दबाव आणू नये, पुन्‍हा अशा गुन्‍ह्यात सहभागी घेवू नये, अशा अटी घालून विशेष न्‍यायाधीश राहुल रोकडे यांनी राणा दाम्‍पात्‍याला प्रत्‍येकी 50 हजार रुपयांच्‍या वैयक्‍तिक हमी तसेच तेवढ्याच रकमेचे दोन हमीदार देण्‍याच्‍या अटींवर जामीन मंजूर केला आहे.




जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा यांना भायखळा तुरूंगात, तर रवी राणा यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात  करण्‍यात आली हाेती. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यावर 124 अ आणि 353 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोन स्वतंत्र एफआयआर दाखल केले आहेत. त्यामुळे दोन एफआयआर विरोधात राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याची कानउघाडणी केली होती.   


टिप्पण्या