Brutal murder of a youth in Umri akl: उमरी परिसरात युवकाची निर्घृण हत्या ; एक संशयित ताब्यात अन्य आरोपी फरार



 


भारतीय अलंकार 24

अकोला : छोट्या उमरी निबंधे प्लॉट परिसरातील एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवार सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन हद्दीत मोठी उमरी रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळ ही घटना घडली आहे.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला आहे. उशीरा रात्री एका संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.



उमेश अंबादास अटाळकर, (वय 35 रा.लहान उमरी निबंधे प्लॉट) असे हत्या झालेल्या  युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर पोलीस उपअधीक्षक सुभाष दुधगावकर व सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे कर्मचारी पाहोचले.


मिळालेल्या माहितीनुसार,अकोला शहरातील छोट्या उमरी रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळील चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या उमेश अंबादास अटाळकर या युवकावर अज्ञात युवकांनी प्राणघातक हल्ला केला. या युवकांनी उमेशच्या छातीवर आणि चेहऱ्यावर चाकूने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. यानंतर  घटनास्थळावरून पसार झाले. 



जखमी झालेल्या उमेशला तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने रिक्षातून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, त्याच्या कुटुंबीयांनी व त्याच्या मित्रांनी रुग्णालय गाठले. 


जुन्या वैमनस्य मधून ही हत्या करण्यात आली असण्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती. हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.  मारेकऱ्यांमध्ये किती लोकांचा सहभाग आहे, हे अद्याप पर्यंत कळू शकले नाही.या सर्व मारेकऱ्यांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मारेकरी आणि मृतक उमेश हे सोबत होते. अचानक यांच्यामध्ये वाद झाले आणि वादाचे रूपांतर हत्येपर्यंत पोहचले. हा वाद सुरू असताना येथे उपस्थित असलेल्या एका युवकाने मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हाताला यामध्ये दुखापत झाल्याची माहिती आहे. दरम्यान उशीरा रात्री पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढील तपास सिव्हिल लाइन्स पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या