V.C.A-T20-cricket-tournament-Akl: व्ही. सी. ए. टी- 20 क्रिकेट स्पर्धेची जय्यत तयारी; अकोला संघ निवड चाचणी उद्या




ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला: रेड बॉल क्रिकेटमध्ये यश मिळाल्या नंतर आणि व्हाईट बॉल क्रिकेटला चालना देण्यासाठी विदर्भातील जिल्हा ठिकाणी विदर्भ क्रिकेट संघटना द्वारा  3 ते 10 एप्रिल पर्यंत आंतरजिल्हा टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. याकरीता जिल्हा संघ निवड चाचणी सामने घेण्यात येणार आहे.अकोला संघ निवड चाचणी उद्या शनिवार 26 मार्च रोजी सकाळ व दुपार अश्या दोन सत्रात होणार आहे.



अंतिम सामना अमरावतीला




टी - 20 स्पर्धेतील सामने अमरावती व गोंदिया येथे होतील. उपांत्य व अंतिम सामना अमरावती येथे होईल.


अशी होईल स्पर्धा




विदर्भातील जिल्हा ठिकाणाहून नवीन आणि आश्वासक प्रतिभा ओळखण्यासाठी व्ही.सी.ए ने विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यामध्ये खुल्या निवड चाचण्या घेतल्या असून, यामध्ये 1107 खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यामधून 22 चमूत 294 खेळाडूंचा सहभाग असून  25 ते 27 मार्च पर्यंत 22 चमूत निवड चाचणी सामने होतील. त्यामधून स्पर्धेकरिता अंतिम 10 चमू निवडल्या जातील. ही चमू त्यांच्या जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करतील. सदर स्पर्धेमुळे काही चांगले प्रतिभावान खेळाडू दिसून येतील जे दीर्घकाळ संघटनेची सेवा करू शकतील, अशी आशा विदर्भ संघटनेने व्यक्त केली आहे.


ही स्पर्धा नितेश उपाध्याय चेयरमन व्ही.सी.ए. जिल्हा समिती यांच्या मार्गदर्शनात होत असून, जिल्हा समिती सदस्य व संबंधित जिल्ह्यातील संयोजक परिश्रम घेत आहेत, अशी माहिती व्ही.सी.ए. जिल्हा समिती सदस्य तथा अकोला जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी दिली. 


अकोला संघ निवड चाचणी



अकोला जिल्हा संघ निवडण्याकरिता शनिवार 26 मार्च रोजी सकाळी 9 व दुपारी 2 वाजता असे दोन सत्रात टी-20 निवड चाचणी सामन्यांचे आयोजन केले असून, व्ही.सी.ए. द्वारे निवड समिती सदस्य अकोल्यात दाखल होतील. 



एसीसी सज्ज 


निवड चाचणी सामन्यांसाठी एसीसी मैदानाची शुक्रवारी पाहणी झाली.संपूर्ण मैदानावर टँकर द्वारा पाणी शिंपडण्यात आले. रोलर फिरवून समतल करण्यात आले. यावेळी खेळपट्टीचे विशेष निरीक्षण करण्यात आले. मैदानावर अकोला जिल्हा संघात खेळण्यास उत्सुक असलेले खेळाडू कसून सराव करत होते.

टिप्पण्या