Pay full School fee:education: पूर्ण फी भरा अन टी सी घेवून जा…! अल मेहमुद इन्टरनॅशनल स्कुलने विद्यार्थ्यांच्या पालकांना धरले वेठीस; शाळेविरुध्द थेट शिक्षणमंत्री गायकवाड यांच्याकडे तक्रार

Pay full fee and take the TC ...   Complaint against the school to Education Minister Gaikwad





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: पूर्ण फी भरा आणि टी सी घेवून जा...असे फर्मान अल मेहमुद इन्टरनॅशनल स्कुलने काढून विद्यार्थ्यांच्या पालकांना अक्षरशः वेठीस धरले आहे. यामुळे आता पालकांनी शाळेविरुध्द दंड थोपटले असून थेट राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे शाळा प्रशासनाची तक्रार केली आहे.

  


काय आहे प्रकरण


मुजीब उर रहेमान हे विद्यार्थ्याचे पालक आहेत. त्यांचे दोन पाल्य अल मेहमुद इन्टरनॅशनल स्कुल मध्ये अनुक्रमे इयत्ता पाचवी व दुसरी मध्ये शिकत होते. त्यांना  पुर्नप्रवेशाकरिता मागील वर्षाची फि भरून नव्याने प्रवेश घेण्याकरिता फि ची मागणी शाळेने पत्र देऊन केली आहे. 



वास्तविक कोरोना काळात शाळा बंद होत्या. त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाने शाळांनी पालकांना फी वसुलीसाठी सक्ती करू नये, असे आदेश दिले होते. तसेच शाळा जर पालकांना वेठीस धरून टी. सी. देत नसतील तर ज्या शाळेत प्रवेश करत असाल, त्या शाळांनी विना टी सी प्रवेश द्यावा, असेही सूचित केले होते.  त्यामुळे शाळा आणि पालकांचा फी बाबत गोंधळ सुरूच आहे.   



मुजीब यांच्याकडे मागील वर्षी कोरोना काळात कोणतेही आर्थिक स्त्रोत उपलब्ध नव्हते. तरीसुद्धा यादरम्यान ५० टक्के शाळा फी त्यांनी भरली आहे. मात्र आता अल मेहमुद इन्टरनॅशनल स्कुल, पाचमोरी, अकोटरोड  यांचे विद्यार्थ्यांच्या पालकांना वेठीस धरणे सुरूच असून शाळेने  पुर्ण रक्कम भरून टी.सी. न्या, असे लेखी पत्र  देवून बजावले आहे. त्यामुळे या पालक मुजीब उररहेमान यांनी राज्याच्या शिक्षण मंत्री ना वर्षाताई गायकवाड यांचेकडे ऑनलाईन पध्दतीने तक्रार दाखल केली आहे.



कोरोना काळात रोजगार उपलब्ध नसल्याने उर्वरित फी भरणे शक्य नाही.  शासनाने  विद्यार्थांच्या प्रवेशाकरिता फी चा तगादा लावता काम नये, अशी शिक्षण संस्थाना ताकीद दिली असतांनाही आपल्या आदेशाची अवहेलना करून सदर शिक्षण संस्था करून पालकांना मानसिक त्रास देत आहे. ऐपती प्रमाणे पैसे भरले असल्याने राज्य स्तरावरून सदर शिक्षण संस्थेला पाल्याची टि.सी. देण्याची ताकीद द्यावी. जेणे करून पाल्याचे शिक्षण वाया जाणार नाही. अशी आर्त हाक पालकांनी शिक्षणमंत्र्यांना दिली आहे. 




या शिक्षण संस्थेने सुरवातीला पाल्याची अ‍ॅडमिशन करतेवेळी सीबीएससीची मान्यता असल्याचे खोटे दर्शवून प्रवेश घेतले.आणि आता पुढील शिक्षणासाठी सीबीएससी शिक्षण देण्यास असमर्थता दर्शवितात. त्यांचा एक पाल्य अतिकउर रहेमान गत ९ वर्षापासुन सदर शिक्षण संस्थेत सीबीएससी अभ्यासक्रम घेत असतांना आता त्याला स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम देण्यासाठी पालकांवर पत्रान्वये दबाव आणण्याचा प्रयत्न करित आहेत,असा आरोप मुजीब उर रहेमान यांनी केला आहे .


मुजीब यांनी स्वतः शिक्षण संस्थेस 31 जुलै रोजी तर शिक्षणाधिकारी  मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्री अकोला यांना 9 ऑगस्ट रोजी अवगत करीत तक्रार दिली होती. मात्र तक्रारीची दखल कुणालाच घ्यावीशी वाटली नाही. उलट 29 ऑगस्ट रोजी शाळा मुख्यध्यापक यांच्या कडून पूर्ण फी भरा आणि टी सी घेवून जा, या आशयाचे पत्र पालकांना मिळाले. यानंतर  मात्र आता 8 सप्टेंबर रोजी मुजीब यांनी थेट शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे या संपूर्ण प्रकाराबाबत शाळे विरुद्ध तक्रार केली आहे. राज्याचे शिक्षण मंत्री न्याय देतील, अशी अपेक्षा पालक मुजीब यांनी तक्रारीत केली आहे. 



या तक्रारींच्या सत्यप्रति  शिक्षण अधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना कार्यालयात जाऊन दिल्या आहेत, अशी माहिती पालक मुजीब उर रहेमान यांनी प्रसार प्रसार माध्यमांना दिली आहे. यासंदर्भात शाळा प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता वृत्त लिहेस्तोवर होवू शकला नाही.

टिप्पण्या