CDPO suicide case: महिला सीडीपीओ यांची गळफास घेऊन आत्महत्या; लाखनी येथील घटना



भंडारा: लाखनी येथील एकात्मिक बाल सेवा प्रकल्पाच्या  युवा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी कुटुंबीय झोपी गेल्यावर भाड्याच्या घरी बाथरूम मधील लाकडी गजाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी पहाटे ३.३० वाजता उघडकीस आली. शितल अशोक फाळके  (वय 28 वर्ष रा. पाळडी  ता. कोरेगाव जि. सातारा, हल्ली मुक्काम प्रभाग क्र.५ लाखनी) असे  मृतक महिला अधिकारी यांचे नाव आहे. या घटनेने महिला व बाल विकास विभागात खळबळ उडाली आहे लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.





शितल फाळके या एकात्मिक बाल प्रकल्प लाखनी येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून जून २०१७ मध्ये रुजू झाल्या. कार्यालय जवळील  माणिक निखाडे यांचे घरात भाडेकरू म्हणून आईसह वास्तव्यास होत्या. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्याती प्राप्त असल्या तरीही मागील काही दिवसापासून त्या तणाव ग्रस्त होत्या शुक्रवारी  कार्यालयात त्या नाराज असल्याचे अधीनस्थ कर्मचाऱ्यांनी सांगितले.  रात्री जेवण करून माय लेकींनी रात्री अकरा वाजता दूरदर्शन वरील कार्यक्रम पाहिले,नंतर झोपण्यासाठी गेल्या.  पहाटेच्या सुमारास आई लघुशंका करता बाथरूम मध्ये गेली असता बाथरूम मधील लाकडी गजाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत शितल आढळल्या. आईने आरडाओरड केली असता घर मालक  व आजू बाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले. नागरिकांनी घटनेची माहिती लाखनी पोलिसांना दिली. 




पोलीस निरीक्षक मनोज वाडीवे सहाय्यक फौजदार विजय हेमने  पोलिस नायक उमेश शिवणकर, महिला पोलीस नाईक वासंती बोरकर, पोलीस शिपाई नितीन झंझाड, चालक मंगेश चाचेरे यांच्यासह पोलिस गाडीने घटनास्थळी पोहचले. पंचनामा करताना सुसाईड नोट पोलिसांना मिळाली. त्यात त्यांनी स्वतःच्या मर्जीने आत्महत्या करत असून आई मला माफ कर असे लिहिलेले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. 




घटनास्थळी गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, संख्यांकिकी विस्तार अधिकारी उमेश खाकसे यांनी भेट दिली.   लाखनी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून, घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर व त्यांचे सहकारी पोलीस शिपाई मुकेश गायधने करीत आहे. अंत्यसंस्कार मृतकाचे स्वगावी होणार असल्याची माहिती आहे. या घटनेने महिला व बाल विकास  विभागात खळबळ उडाली आहे.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा