Navratri2020: जिजाऊ ब्रिगेडचा नवरात्रात 'जागर लोककलेचा, वसा स्त्रीशक्तीचा' उपक्रम

नवमहानायिका एकपात्री प्रयोग : लोकगीतांचा अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री शक्तीचे दर्शन





अकोला : मराठा सेवा संघ प्रणित महाराष्ट्र प्रदेश जिजाऊ ब्रिगेडतर्फे नवरात्रौत्सवानिमित नऊ दिवस 'जागर लोककलेचा, वसा स्त्रीशक्तीचा' या उपक्रमांतर्गत बहुजन महानायिकांचे एकपात्री प्रयोग, तसेच महाराष्ट्रभरातील विविध सांस्कृतिक लोकगीते जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सादर करणार आहेत. त्यासह अनिष्ठ रुढी -परंपरा , अंधश्रध्दा निर्मुलनपर आणि स्त्रीशक्तीचे दर्शन या विषयांवर व्याख्यानमालेसह विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती जिजाऊ ब्रिगेड इंदूताई देशमुख यांनी दिली आहे .


नवरात्रात  17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान दुपारी 2 ते 4 या वेळात हे कार्यक्रम होणार आहे. यामध्ये घटस्थापनेच्या दिवशी, दुपारी 2 वाजता ऑनलाईन होणाऱ्या कार्यक्रमाचे उदघाटन शिवधर्म संसद सदस्या माजी आ. रेखाताई खेडेकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करणार आहेत. तसेच शिवप्रदीपाचार्य डॉ . दिलीप धानके ठाणे यांचे जिजाऊ पारायण, साहित्यिक डॉ. प्रा. उषा सावंत नाशिक यांच्या जात्यावरच्या ओव्या, लग्न व हळदीगीत, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुभाष देसाई कोल्हापूर यांचे अंबाबाई माहात्म्य, सत्य व मिथके यावरील यावरील व्याख्यानाचा समावेश आहे. 


डॉ. शंकरराव निकम मुंबई यांचे स्त्री पुरुष समानता व स्त्रियांचे धार्मिक अधिकार या विषयांवर व्याख्यान, प्राचार्या डॉ . अनुराधा वरहाडे यांच्याशी लाईव्ह हितगुज, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य प्रसिद्धीप्रमुख क्षीप्रा मानकर अमरावती यांचे समाज घडणीसाठी समाज परिवर्तन यावर व्याख्यान होईल. डॉ. विजय चोरमारे कोल्हापूर यांचे वर्तमानातील स्त्री शक्ती ओळख या विषयावर व्याख्यान, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. साहेब खंदारे परभणी  हे देवींबाबत मिथकांचा संबंध यावर समारोपीय व्याख्यान करतील. ब्रिगेड या संपूर्ण कार्यक्रमाची तांत्रिक व्यवस्था क्षीप्रा मानकर सांभाळणार आहेत. 


हे सगळे कार्यक्रम महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या अधिकृत पेजवर पाहायला मिळतील, जिल्हयातील सर्व फेसबुक युझर्सनी या पेजवर कार्यक्रम पहावा, असे आवाहन महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कोषाध्यक्ष इंदुताई देशमुख, राज्य कार्यकारणीच्या सदस्य सुरेखा राऊत, विभागीय अध्यक्ष संजीवनी बाजड,  जिल्हाध्यक्ष आम्रपाली आखरे, जिल्हा सचिव वर्षा पोरे, शहराध्यक्ष वृषाली गाडे आदींसह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

टिप्पण्या