akola-news-legal-updates-court news: हुंडाबळी, मानसिक-शारीरिक छळ प्रकरणात जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय





हुंडाबळी, मानसिक-शारीरिक छळ प्रकरणात जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय


ठळक मुद्दे :


 *भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ अंतर्गत ७ वर्षांची सक्तमजुरी

 * कलम ४९८-अ अंतर्गत १ वर्ष कारावास व दंड

 *इतर आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

 *सात साक्षीदारांच्या साक्षीवर 

न्यायालयाचा निर्णय



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करून तिला जीवन संपविण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या गंभीर प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने आरोपी पती आशीष वसंतराव नागे याला दोषी ठरवत भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ अंतर्गत सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे. तसेच कलम ४९८-अ अंतर्गत एक वर्ष कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे.


दिनांक १९.०६.२०२६ रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  द. पां. सातवळेकर, यांनी आरोपी आशिष वसंतराव नागे, (वय अंदाजे ३२ वर्ष, रा. पैलपाडा, ता. जि. अकोला), याला भा.दं.वि. कलम ३०६, ४९८-अ भा.दं.वि. अंतर्गत दोषी ठरवुन शिक्षा सुनावली आहे.


प्रकरणातील माहितीनुसार, मृत जयश्री नागे हिला विवाहानंतर सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच हुंड्याच्या पैशासाठी दबाव टाकण्यात येत असल्याची बाबही तक्रारीत नमूद करण्यात आली होती. यासोबतच आरोपीचे अन्य महिलांशी संबंध असल्याचा संशय आणि त्यातूनही वाद होत असल्याचे समोर आले होते.

तक्रारीनुसार, पीडितेला सातत्याने अपमानास्पद वागणूक देण्यात येत होती. या छळामुळे ती मानसिक तणावाखाली होती. अखेरीस २३ ऑगस्ट २०२२ रोजी जयश्रीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

या प्रकरणात सरकारी पक्षाने एकूण सात साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षींचा विचार करून आरोपी पतीला दोषी ठरविले. मात्र इतर आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले.


या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष प्रयत्न करण्यात आले असून न्यायालयाच्या या निर्णयामुळे कौटुंबिक अत्याचार आणि महिलांवरील छळाच्या प्रकरणांबाबत कठोर संदेश गेल्याची चर्चा आहे. सदर प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील शाम खोटरे यांनी सरकार पक्षाची बाजु मांडली. तसेच पैरवी अधिकारी ए.एस.आय. अनवार खान, उकंडा जाधव व  प्रविण माथने पो.स्टे. उरळ यांनी सहकार्य केले.





टिप्पण्या