msedcl-akola-city-west-rainy-: जोरदार पावसाचा कहर…अर्धे शहर अंधारात गुडूप






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: आज सायंकाळी अकोला शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. नागरिकांना उकाडा पासून सुटका मिळाली. मात्र वीज पुरवठा खंडित झाल्याने त्रस्त झाले आहेत. जवळपास  चार - पाच तास पासून जुनेशहर भागातील अनेक भागात  विद्युत पुरवठा बंद आहे.



काल देखील सायंकाळ पासून रात्री बारा एक वाजे पर्यंत लाईन बंद होती. आज देखील हीच परिस्थिती आहे. जुना काॅटन मार्केट, मार्केट एरिया खोलेश्वर, नागपुरी जीन, मारवाडी प्रेस भागातही अंधार आहे. डाबकी रोड भागातही विद्युत पुरवठा बंद आहे. गणेश नगर, गोडबोले प्लॉट, भीम नगर आदी भाग अंधारात गुडूप झाला आहे.




थोडा जरी पाऊस आला की तासनतास लाईन बंद होते. इतर वेळी सुध्दा या भागात आजकाल अगदी रोज दोन तीन वेळा लाईन जातेच. संबंधिताची इकडे इतकी का मेहरबानी आहे.याचे कारणच न समजण्याचे पलीकडच आहे. या भागात ही माणसच राहतात. मनमाने लावलेले विद्द्युत देयके ही भरतात. अन्य सर्व भागात होत असलेली विद्युत चोरी काही प्रमाणात या भागात ही होत असेल? तरी ही इतके दुर्लक्ष,लोकांची प्रताडना? संबंधित अधिकार्‍यांनी, कर्मचार्‍यांनी लक्ष दिले पाहीजे, अश्या संतप्त प्रतिक्रिया त्रस्त नागरिकांनी दिल्या.



दरम्यान भिमनगर फिडर ब्रेकडाऊनमध्ये आहे आणि गणेश नगर फिडरचा काही भाग सुर करण्यात आला आहे. वीज पुर्ववत करण्यासाठी यंत्रणा काम करत आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात या भागातील लाईन गेलेलीच आहे. मधामधात एक दोन वेळ एक एक सेकंदसाठी लाईन आली होती. मात्र लगेच लाईन गेल्याने आनंदी झालेल्या नागरिकांचा हिरमोड होत गेला.  लाइन आली आली लाईन गेली गेली. बस एवढंच एकेका घरातून आवाज येत आहेत. त्यात भरीस भर महानगर पालिकेच्या कृपेने मच्छरांचा सत्संग नागरिकांना लाभत असल्याने, माच्छारांचे गुणगुणने आणि त्यांचा हल्ला अंधारात बसून नागरिकांना सहन करणे भाग पडत आहे.

नियमित वेळेवर वीज बिल भरणाऱ्या नागरीकांना काही कारणास्तव एखाद वेळी बील भरण्यास विलंब झाल्यास लगेच वीज कंपनी विलंब शुल्क आकारते. मात्र नियोजन शून्य कारभार आणि झीरो मेंटनन्स ठेवणाऱ्या कंपनीवर नागरिकांनी कोणत्या स्वरूपाची कारवाई करावी,असे संतप्त नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला. दरम्यान सायंकाळीं पाच साडे पाच पासून खंडित झालेला वीज पुरवठा रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास सुरळीत झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.


मात्र अकोला पश्चिम भागात विज पुरवठा खंडित होण्याची समस्या कायमची झाली आहे. हाच विकास का आणि हीच स्मार्ट सिटी का, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे. एकीकडे विकासाच्या बाता करणाऱ्या सत्ताधाऱ्याना या समस्या मुळे येत्या निवडणुकीत शॉक बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, एवढे मात्र नक्की.








टिप्पण्या