file image
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे धागेदोरे अकोला (विदर्भ) पोहचल्याने महाराष्ट्र पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. तिसरा आरोपी प्रवीण लोणकर याला आज पुणे येथुन पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण लोणकर हा शुभम लोणकर याचा मोठा भाऊ असून, दोघेही लॉरेन्स बिश्नोई याच्या गँगचे सदस्य असल्याचे समजते. लोणकर बंधू अकोला जिल्हयातील अकोट तालुक्यातील मूळ रहिवासी आहेत.
बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर शुभम लोणकर याने एक पोस्ट फेसबुक या सोशल मीडिया ॲपवर पब्लीश केली होती. लॉरेन्स बिष्णोई गँगने ही हत्या केल्याचे त्याने पोस्टमधून जाहीर केले. यानंतर पोलिसांनी लोणकर बंधूंचा शोध घेण्यास सुरूवात केली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, प्रवीण लोणकर (28) हा शुभम लोणकर याचा मोठा भाऊ असून, शुभम लोणकरसह प्रवीण लोणकरही बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कटात सहभागी होता. त्यांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कटात धर्मराज कश्यप आणि शिव कुमार गौतम यांना सहभागी करून घेतले होते. प्रवीण लोणकरसह पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली असून, दोघांचा शोध घेत आहेत.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात शुभम लोणकर हादेखील आरोपी असून मुंबई क्राईम ब्रँचकडून त्याचा शोध सुरू आहे. पुण्यात धर्मराज कश्यप आणि शिवानंद हे ज्या भंगाराच्या दुकानात काम करत होते, त्या भंगाराच्या दुकानाच्या बाजूलाच प्रवीण लोणकर याच्या मालकीचे दुकान आहे. या हत्येसाठी प्रवीण लोणकर आणि शुभम लोणकर यांनी मिळून शिवानंद आणि धर्मराज कश्यप यांना निवडल्याचा संशय पोलिसांना आहे. तर शुभम हा हत्येचा सूत्रधार असल्याचे बोलल्या जात आहे.
दोघेही भाऊ गावातून फरार
अकोट तालुक्यातील नेव्हरी येथील शुभम लोणकर याचा काही महिन्यांपासून बिश्नोई गँगशी संपर्क आल्याने अकोला व अकोट पोलिसांनी त्याच्या मूळगावात शोध घेतला. बिष्णोई गँगशी संबंध असलेल्या शुभम लोणकर व त्याच्या भावाचा शोध घेणाऱ्या पोलिसांना ते दोघेही घरी आढळले नाही. त्याचे घराला कुलूप दिसल्याने पोलिसांनी शेजारी विचारपूस केली असता, जून 2024 च्या पहिल्या आठवड्यात ते अकोट सोडून गेल्याची माहिती दिली.
दरम्यान आज शुभम लोणकर याने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली होती. अनुज थापन याच्या मृत्यूचा बदला म्हणून ही हत्या केल्याचे पोस्टमध्ये म्हटलेले आहे. जो सलमान खान आणि दाऊद गँगची मदत करणार त्यांनी आपला हिशेब तयार ठेवावा, अशी चेतावणी या पोस्टमधून दिली गेली.
शुभम लोणकर हा पुण्यातील वारजेनगरमध्ये राहायचा, त्याला 30 जानेवारी रोजी अकोट (अकोला) पोलिसांनी अवैध शस्त्रांसह त्याला उज्जैन येथून अटक केली होती. तपासात शुभम लोणकरचं कनेक्शन लॉरेन्स बिश्नोई गँगसह असल्याचं समोर आले होते.
शुभम लोणकर अकोला पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून शुभमचे जाळे दुबई आणि इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पसरले आहे. शुभमचे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्याशी संबंध असल्याचे उघड झाले होते. लोणकर आणि लॉरेन्स बिश्नोई या दोघांच्या संभाषणाचं कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे.
दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीची सुध्दा ओळख पटली असून चौथ्या आरोपीचे नाव मोहम्मद झिशान अख्तर असल्याची माहिती समोर येत आहे. फरार शिवानंद आणि चौथ्या आरोपीचा तीन राज्यांमध्ये पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा