badlapur-case-akshay-shinde: बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे चा ‘एन्काऊंटर’ ; राजकिय वातावरण तापले




भारतीय अलंकार न्यूज 24

महाराष्ट्र: बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याच्या आरोपाखाली पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी अक्षय शिंदे याचा आज मृत्यू झाला. अक्षय शिंदे याच्या मृत्यू नंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. विरोधकांनी या मृत्यूची सखोल चौकशीची मागणी केली आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.




काय आहे नेमके प्रकरण 


ठाणे क्राइम ब्रँचच्या टीमने आज आरोपी अक्षय शिंदे याला तळोजा जेलमधून ताब्यात घेतले होते. तसेच त्याला दुपारच्या सुमारास घटनास्थळाची पाहणी करण्याकरीता घेऊन असताना मुंब्रा बाह्यवळण मार्ग येथे पोहोचताच अक्षयने पोलिसांजवळील बंदूक हिसकली आणि पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही त्याच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात अक्षय जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या वाहनातच घडला.




प्रकरणाची पार्श्वभूमी 

काही दिवसांपूर्वीच बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेनंतर बदलापूरमध्ये नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण होते. त्यानंतर आरोपी अक्षय शिंदे याला अटकही करण्यात आली होती. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. एसआयटीच्या टीमने या प्रकरणाचा तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. असे असतानाच अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांची क्राईम ब्राँच टीमने त्याला ताब्यात घेतले होते. सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळीबार केला यात तो ठार झाला.


बदलापूर शाळेतील निष्पाप मुलींचे शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांचे हत्यार हिसकावून घेत वाहनातील पोलिसांवर गोळीबार केला.  यामध्ये पोलीस अधिकारीही जखमी झाले असून, पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेला गोळी लागली आहे.  त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचार दरम्यान आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. 


आरोप प्रत्यारोप  


बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पोलिसांचा स्वसंरक्षणाचा हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. हातात बेड्या असलेला आरोपी पोलिसांचे पिस्तूल कसे हिसकाऊ शकतो?”, असा सवाल अनिल देशमुख यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत केला आहे.


या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य केलं आहे.

चिमुरड्यांना अखेर निसर्गानेच न्याय दिला असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. तर अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणात राजकारण करू पाहणाऱ्या विरोधकांनी अकलेचे तारे तोडायला सुरुवात केली असल्याची टीकाही त्यांनी केली. बाळासाहेब ठाकरे आज जिवंत असते तर त्यांनी पोलिसांची पाठ थोपटली असती, असं ही ते म्हणले. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ आरोपीचे एनकाउंटर केले असेल तर पोलिसांना दोष देणारे अक्कलशुन्य म्हणावे लागतील असं ही ते म्हणले. त्याच प्रमाणे मिटकरी यांनी पोलिसांची स्तुतीही केली.




बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी पोलिसांच्या अटकेत असलेल्या आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून काही त्रुटी झाली असं आज आरोप करता येणार नसल्याचा विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी म्हटलं आहे. तर पोलिसांनी या प्रकरणात काळजी मात्र घेतली पाहिजे होती, असा सल्ला उज्वल निकम यांनी दिला आहे. तर आरोपीला हातकडी लावण्यात आली होती की नाही हे पोलीस तपासात निष्पन्न होणार असल्याचेही ते म्हणाले. अक्षय शिंदे यांच्या विरोधात भरपूर पुरावे असताना त्याला फाशीची शिक्षा झाली असती असा विश्वासही यावेळी उज्वल निकम यांनी व्यक्त केला. त्यामुळे अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याच्या बोलण्यात कोणतेही तथ्य नसल्याचंही निकम म्हणाले. तर अक्षय शिंदे हा विकृत मानसिकतेचा होता आणि पोलिसांनी घटनेच्या वेळेस योग्य ती खबरदारी घेतली होती की नाही यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.









टिप्पण्या