Pandharpur Warkari:अन्यथा 'चलो पंढरपूर' नारा देत एक लाख वारकरी पंढरीत होणार दाखल...

अन्यथा 'चलो पंढरपूर' नारा देत एक लाख वारकरी पंढरीत होणार दाखल...


*सरकारने जर मंदिरे उघडे करण्याची तारीख जाहीर केली नाही तर ३१ ऑगस्टला पंढरपूरला विठ्ठल मंदिराचे कुलूप तोडून मंदिराच्या आत ठिय्या आंदोलन करू-वारकरी सेना


*आषाढी पौर्णिमेला सुद्धा भक्तांना आपल्या माऊलीची गळाभेट घेता आली नाही.पाच महिन्यापासून पंढरीनाथाच्या दर्शनासाठी वारकरी आतुरलेले आहेत.



भारतीय अलंकार
अकोला: गेल्या सहा महिन्यापासून कोरोना संकटाचे नाव घेऊन सरकारने महाराष्ट्रातील मंदिरे बंद करून ठेवलेली आहेत. आणि भजन-कीर्तन केल्यास गुन्हे दाखल करीत आहे. सरकारने सध्या मॉल, चित्रपट शूटिंग, देशी दारू, इतर सर्वच जवळ जवळ सगळीकडचे व्यवहार सुरळीत चालू केलेला आहे. आणि या सर्व ठिकाणी गर्दी दिसून येत आहे. पण, महाराष्ट्रातील देवस्थान मात्र बंद आहेत. २६ ऑगस्ट पर्यंत जर सरकारने महाराष्ट्रातील देवस्थान उघडे करण्याची तारीख जाहीर केली नाही तर ३१ ऑगस्टला 'चलो पंढरपूर' नारा लावून महा क्षेत्र पंढरपूर येथे किमान एक लाख वारकरी दाखल होवू,असा निर्णय महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांनी घेतला आहे. 


ज्याप्रमाणे रावणाने तेहतीस कोटी देव बंदी करून  ठेवले होते, त्याप्रमाणे सध्या सरकारने सुद्धा देव बंदिस्त करून ठेवलेले आहेत,असा आरोप वारकरी सेनेने केला आहे. सरकारने देशी दारूची दुकाने उघडी केली अर्थात सरकारचा दारू पिणाऱ्यावर विश्वास आहे की, पिणारे सोशल डिस्टंस ठेवून दारू पितील? की, महाराष्ट्रातील वारकरी सोशल डिस्टंसिंगने दर्शन घेतील? 
सरकार मंदिराला वैयक्तिक मालमत्ता समजत आहे की काय हा प्रश्न पडलेला आहे,असे वारकरी सेनेने म्हंटले आहे.

खरं म्हणजे देवस्थानावर व्यवस्थापक नियोजक म्हणून सेवक या नावाने सरकार आहे आणि मंदिराचे खरे मालक महाराष्ट्रातील वारकरी भगवंताचे भक्त आहे आणि म्हणून सेवकाने आपल्या पायरीने राहावे मालक होण्याचा प्रयत्न करू नये,असे देखील वारकरी सेनेने म्हंटले आहे. 

येत्या २६ ऑगस्ट पर्यंत जर सरकारने महाराष्ट्रातील देवस्थान उघडे करण्याची तारीख जाहीर केली नाही तर ३१ ऑगस्टला 'चलो पंढरपूर' नारा लावून महाक्षेत्र पंढरपूर येथे किमान एक लाख वारकरी दाखल होणार आहेत आणि सर्वात आधी आम्ही विश्व वारकरी सेनेचे पदाधिकारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कुलूप तोडून मंदिरामध्ये प्रवेश करून, मंदिरामध्ये ठिय्या आंदोलन करणार आहोत
आणि म्हणून सरकारने या बाबीचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्रातील देवस्थाने नियम अटी लावून त्वरित उघडी करावी व  भजन-कीर्तन करण्याकरिता रीतसर नियम व अटी लावून परवानगी द्यावी, अशी मागणी युवा विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष'ह भ प गणेश महाराज शेटे, विश्व वारकरी सेना राष्ट्रीय युवक अध्यक्ष हभप जगन्नाथ महाराज देशमुख यांनी केली आहे.

 
" मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली नाहीतर, विश्व वारकरी सेना महाराष्ट्रातील इतर वारकरी संघटना व वंचित बहुजन आघाडी एडवोकेट प्रकाश आंबेडकर  यांच्या उपस्थितीत एक लाख वारकऱ्यांच्या सोबत महाक्षेत्र पंढरपूर येथे आंदोलन करणार"
                       - गणेश महाराज शेट्ये 

टिप्पण्या