corona:फतेह चौकातील ६१ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह

फतेह चौकातील ६१ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह

अकोला,दि.३०:  बैदपूरा येथील फतेह चौक भागातील एका ६१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल  पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी नुकतीच दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ६८२ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ६४८ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ६२० अहवाल निगेटीव्ह २८ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  ३४ अहवाल प्रलंबित आहेत.

आजपर्यंत एकूण ६८२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५३४, फेरतपासणीचे ८७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ६१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६४८ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५०० तर फेरतपासणीचे ८७ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ६१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६२० आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २८  आहेत.

आज प्राप्त झालेल्या ३१ अहवालात ३० अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर एक अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

आता सद्यस्थितीत  २८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील तिघे जण मयत आहेत.  गुरुवारी (दि.२३) सात जण व सोमवारी (दि.२७) एका जणास व आज (दि.३०) तिघांना असे ११ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १४ जण उपचार घेत आहेत.

नवा रुग्णही बैदपुऱ्यातीलच

दरम्यान आज ज्या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला तो ६० वर्षीय व्यक्ती असून तो हि बैदपूरा भागातील  फतेह चौक येथील रहिवासी आहे. या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाने सुरु केले आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली.

दरम्यान आजअखेर ६७५ प्रवासी आले आहेत. त्यापैकी  ३१८ गृहअलगीकरणात व ८४ संस्थागत अलगीकरणात असे ४०२ जण अलगीकरणात आहेत. तर २४० जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे. तर ३३ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

बैदपुऱ्यातील तिघांना दिला डिस्जार्ज

आज सायंकाळी तिघा रुग्णांना पूर्ण बरे झाल्यानंतर  डिस्चार्ज देण्यात आला. हे तिघे रुग्ण बैदपूऱ्यातील असून त्यातील एक रुग्ण हा जिल्ह्यातील पहिला रुग्ण ठरला होता. हा रुग्ण ६० वर्षे वयाचा इसम असून दि. ५ रोजी दाखल झाला होता. त्याचेवरउपचार करण्यात आले. या दरम्यान त्याचेवर सहा वेळा चाचण्या करण्यात आल्या. त्यातील चौथा अहवाल हा पॉझिटीव्ह आला होता. नंतरचे दोनही अहवाल निगेटीव्ह आल्याने  त्यास घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्यात एका ७५ वर्षिय वृद्धेचा व एका पाच वर्षिय बालिकेचा समावेश आहे. हे दोघेही या पहिल्याच रुग्णाच्या संपर्कातून दि.७ रोजी दाखल झाले होते. त्यांच्याही सहा चाचण्या या दरम्यान झाल्या. चवथा अहवाल पॉझिटीव्ह आला नंतर पुन्हा पाचवा व सहावा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले.

पालकमंत्र्यांची उपस्थिती

या रुग्णांना डिस्चार्ज देते वेळी स्वतः पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचीही उपस्थिती होती. समवेत आ. रणधीर सावरकर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार यांच्यासह उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचाऱ्यांचे पथक उपस्थित होते. उपस्थितांनी टाळ्या वाजवून रुग्णांना निरोप दिला.

......

टिप्पण्या