पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील ४०० व्यक्ती निरीक्षणात

पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील ४०० व्यक्ती निरीक्षणात

अकोला,दि.१४: जिल्ह्यात एकूण १३ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले या रुग्णांच्या निकट व दूरस्थ रित्या संपर्कात आलेल्या तब्बल ४०० व्यक्ती या वैद्यकीय निरीक्षणात आहेत. त्यात ६० अत्यंत निकट संपर्कातील व्यक्ती आहेत. यातच खामगाव जि. बुलडाणा येथील एका पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील बाळापूर येथील दोघांचाही समावेश आहे.

याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, अकोला शहरात पहिल्या टप्प्यात दोन जण पॉझिटीव्ह आढळले होते. त्यातील पहिल्या रुग्णाच्या निकट संपर्कातील १४ व्यक्ती होत्या तर दूरस्थ संपर्कातील ३० व्यक्ती होत्या. निकट असलेल्या व्यक्ती ह्या जास्त जोखमीच्या समजल्या जात असल्याने त्यांचेही घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १० जणांचे अहवाल प्राप्त असून तिघे पॉझिटीव्ह तर अन्य सात जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर कमी जोखमीच्या ३० व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. अकोल्यातीलच दुसऱ्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या निकट संपर्कातील आठ व्यक्ती होत्या. त्यातील सात जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर कमी जोखमीच्या ४९ जणांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर बाळापूर येथून दाखल झालेल्या एका पॉझिटीव्ह रुग्णाच्या (मयत झालेल्या) निकट संपर्कात पाच जण होते. त्या पाचही जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तरीदेखील त्यांना संस्थागत अलगीकरणात तर अन्य २२ व्यक्ती जे दूरस्थ संपर्कात होते त्यांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

पातूर येथील सात व्यक्ती  पॉझिटीव्ह आढळल्या होत्या. त्यांच्या निकट संपर्कात असलेल्या ३१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर दूरस्थ संपर्कातील  २३९ जणांचेही गृह अलगीकरण करण्यात आले असून ३१ जण अद्यापही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संस्थागत अलगीकरणात आहेत. तसेच खामगाव जि. बुलडाणा येथील एका पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले बाळापुरचे  दोघे जण असून त्यांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ते ही संस्थागत अलगीकरणात आहेत.

एकूण जिल्ह्यात  पॉझिटीव्ह रुग्णांच्या अत्यंत निकट संपर्कात ६० जण होते तर  दूरस्थ संपर्कात ३४० जण आल्याचे प्रशासनाने शोधून काढले , हे सर्व जण सध्या संस्थागत वा गृह अलगीकरणात असून ते वैद्यकीय निरीक्षणात आहेत.

टिप्पण्या